राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : आषाढी एकादशीचे औचित्य साधून देसवंडी येथील शिवांकुर विद्यालयाच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात पारंपरिक बालदिंडीचे आयोजन करण्यात आले. वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
बालदिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान केली होती. मुलींनी नऊवारी साडी, गळ्यात तुळशीमाळ, हातात टाळ-मृदुंग आणि कपाळी गंध लावून दिंडीत सहभाग घेतला. तसेच विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत मुक्ताई यांच्या वेशभूषेत उपस्थित राहून दिंडीचे आकर्षण वाढविले.
यावेळी विद्यार्थ्यांनी अभंग, भजन, गवळणी सादर करत वारकरी संप्रदायाची भक्तीपरंपरा जिवंत केली. अभंगांच्या तालावर विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य तसेच शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी मृदुंगाच्या गजरात धरलेला फुगडीचा ठेका उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचे महत्त्व आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यात आली.
या प्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक रावसाहेब (नाना) खेवरे यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. तसेच देसवंडीचे सरपंच नितीन कल्हापुरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब पवार, सचिव डॉ. प्रकाश पवार उपस्थित होते. विश्वस्त मंगलताई पवार व डॉ. गौरी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वसंत शिरसाठ, अमोल बोर्डे, मंगेश बोर्डे, रवी बोर्डे, दिगंबर सरोदे, रमेश कोकाटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने शिव प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने देसवंडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला लहान मुलांचे वजन मोजण्यासाठी डिजिटल वजनकाटा भेट देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अरुण खिलारी यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, परिवहन विभाग, पालक आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.