राहुरी फॅक्टरीत ढाब्यावर जेवताना तरुणावर ९ ते १० जणांचा हल्ला; डोक्यात विटा मारून गंभीर जखमी

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : राहुरी फॅक्टरी येथील जम्मू-काश्मीर ढाब्यावर जेवणासाठी गेलेल्या एका व्यावसायिकावर ९ ते १० अनोळखी व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. २४) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात संबंधित तरुणाच्या डोक्यात विटा व झाडांच्या कुंड्या मारल्याने तो जखमी झाला असून, राहुरी पोलिस ठाण्यात अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित रमेश येवले (वय ३५, रा. आदिनाथ वसाहत, राहुरी फॅक्टरी) यांचे राहुरी फॅक्टरी येथे कार वॉशिंगचे दुकान असून त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

फिर्यादीनुसार, रोहित येवले हे त्यांचे मित्र कृष्णा गंगाधर गाडेकर आणि संतोष बबन निमसे यांच्यासमवेत जम्मू-काश्मीर ढाब्यावर जेवत असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या टेबलाजवळ आली. “उद्या एकादशी आहे, खिचडी खा. हे काय खाताय?” असे म्हणत त्याने संवाद सुरू केला. त्यावर “आम्ही घरचा डबा आणला असून फक्त रोटी घेण्यासाठी आलो आहोत,” असे उत्तर दिल्याने संबंधित व्यक्ती संतापली.

त्यानंतर त्याने स्वतःला अहिल्यानगरचा नगरसेवक असल्याचे सांगत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही वेळातच त्याने त्याच्या सोबत असलेल्या ८ ते ९ जणांना बोलावून घेतले. या सर्वांनी मिळून रोहित येवले यांना चापटांनी मारहाण केली. तसेच हॉटेल परिसरातील झाडांच्या कुंड्या आणि विटा डोक्यात मारल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

मारहाणीदरम्यान सोबत असलेल्या मित्रांनी हस्तक्षेप करून त्यांची सुटका केली. त्यानंतर सर्व हल्लेखोर पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर वाहनातून पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

जखमी अवस्थेत रोहित येवले हे राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने पोलिसांनी त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय, राहुरी येथे उपचारासाठी पाठविले. उपचारानंतर त्यांनी पुन्हा पोलिस ठाण्यात येऊन अनोळखी ९ ते १० जणांविरुद्ध फिर्याद दिली. संबंधित आरोपी समोर आल्यास आपण त्यांना ओळखू शकतो, असेही फिर्यादीने म्हटले आहे.

राहुरी पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *