जन्मतः हृदय उजव्या बाजूला; गंभीर झडपविकारावर यशस्वी शस्त्रक्रिया

डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे दुर्मीळ शस्त्रक्रियेत यश; ६० वर्षीय रुग्णाला जीवदान

अहिल्यानगर : जन्मतःच हृदय छातीच्या उजव्या बाजूला आणि त्यातच हृदयाच्या महत्त्वाच्या मायट्रल झडपेत गंभीर बिघाड, अशा दुर्मीळ आणि आव्हानात्मक परिस्थितीत डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या हृदयशल्यचिकित्सा विभागाने ६० वर्षीय रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. विकारग्रस्त झडप काढून तिच्या जागी कृत्रिम झडप बसविण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती सुधारल्याने त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

संबंधित रुग्णाला गेल्या काही महिन्यांपासून श्वास घेण्यास त्रास, सतत थकवा आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. वैद्यकीय तपासणीत मायट्रल झडपेचा गंभीर विकार असल्याचे निदान झाले. विशेष म्हणजे, या रुग्णाला जन्मजात डेक्स्ट्रोकार्डिया असल्याने त्याचे हृदय छातीच्या डाव्या बाजूऐवजी उजव्या बाजूला होते. त्यामुळे शस्त्रक्रियेपूर्वी हृदयाची असामान्य रचना, दिशा आणि रक्तवाहिन्यांची स्थिती यांचा बारकाईने अभ्यास करून शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात आले.

हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. विनोद चिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली. यावेळी भूलतज्ज्ञ डॉ. राहुल मामडे, डॉ. हर्षल वाळुंज आणि डॉ. केदार देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

दरम्यान, रुग्णालयाच्या हृदयशस्त्रक्रिया विभागाने गेल्या दशकभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०१६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत विभागात २ हजार ३३३ प्रमुख हृदयशस्त्रक्रिया, तर डायलिसिस रुग्णांसाठी २ हजार १६३ एव्ही फिस्टुला प्रक्रिया करण्यात आल्या आहेत. बायपास शस्त्रक्रिया, हृदयाच्या झडपा बदलणे व दुरुस्ती, जन्मजात हृदयदोषांवरील शस्त्रक्रिया तसेच रक्तवाहिन्यांच्या विविध आजारांवर येथे उपचार केले जातात.

शासकीय आरोग्य योजनांच्या माध्यमातूनही रुग्णालयाने मोठे योगदान दिले आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेंतर्गत २०१४ ते जुलै २०२६ या कालावधीत १ लाख ४३ हजार ९९३ लाभार्थ्यांना उपचारांचा लाभ मिळाला आहे. २०१४ मध्ये १५३ असलेली लाभार्थ्यांची संख्या २०२५ मध्ये २० हजार ६०१ वर पोहोचली आहे. या कामगिरीबद्दल रुग्णालयाला २०१८ पासून दरवर्षी प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमधून रुग्ण विविध उपचारांसाठी या रुग्णालयात येतात. नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून रुग्णालयात आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि सुपर स्पेशालिटी विभागांचा विकास केला जात आहे. दुर्मीळ हृदयविकारावरील यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयाच्या वैद्यकीय कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *