प्रांताधिकारी विनीत शिर्के यांच्यावरील हल्ला प्रकरणात संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू; दीपक लाटे टोळीवर पोलिसांचा मोठा दणका

अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या प्रस्तावाला मंजुरी; टोळीप्रमुखासह पाच आरोपी फरार, तिघांना अटक

श्रीरामपूर: शासकीय कर्तव्य बजावत असताना प्रांताधिकारी विनीत शिर्के यांच्यावर वाळू तस्करांच्या टोळीने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध संघटित गुन्हेगारीचे भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ वाढविण्यास परवानगी देण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या गंभीर प्रकरणाचा प्रस्ताव तपासून संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने कारवाई केली आहे. त्यामुळे वाळू तस्करांच्या टोळीभोवती आता कायद्याचा फास आवळला जाणार आहे.

दि. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्रांताधिकारी विनीत शिर्के हे शासकीय वाहनातून मालुंजा येथील शासकीय लिलाव झालेल्या वाळू गटाची पाहणी करून चिंचोलीकडे जात होते. यावेळी गंगापूर शिवारात त्यांना विनानंबरचा हायवा डंपर आढळून आला. तपासणी केली असता डंपरमध्ये सुमारे सहा ब्रास मुरूम आढळला. चालकाकडे मुरमाची रॉयल्टी आणि वाहनाची कागदपत्रे नसल्याचे समोर आले.

कायदेशीर कारवाईसाठी डंपर तहसील कार्यालयात नेण्याचे सांगितल्यानंतर प्रांताधिकारी स्वतः डंपरमध्ये बसले. मात्र, पिंपळगाव फुणगी येथे मोटारसायकली आडव्या लावून डंपर अडविण्यात आला. त्यानंतर काही जणांनी डंपरचा दरवाजा उघडून प्रांताधिकाऱ्यांना खाली खेचले आणि डंपरच्या पुढील चाकाखाली ओढून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून प्रांताधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला. त्यानंतर आरोपींनी डंपरमधील मुरूम रस्त्यावर टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण करत वाहनासह पलायन केले.

या प्रकरणाच्या तपासात दीपक ऊर्फ प्रविण बबन लाटे याच्यासह धनराज चौधरी, सतीश कुदनर, तुषार जाधव, शरद भोसले, दत्ता माळी, अक्षय पवार आणि अर्जुन निकम अशा आठ आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. यापैकी धनराज चौधरी, सतीश कुदनर आणि तुषार जाधव यांना अटक करण्यात आली असून, टोळीप्रमुख दीपक लाटे याच्यासह पाच आरोपी अद्याप फरार आहेत.

विशेष म्हणजे, या टोळीतील आरोपींविरुद्ध यापूर्वी विविध गंभीर स्वरूपाचे एकूण १५ गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींनी आर्थिक आणि भौतिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवल्याचे निरीक्षण अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी नोंदविले. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १११ अन्वये वाढीव कलम लावण्यास परवानगी देण्यात आली आहे.

भारतीय न्याय संहितेतील कलम १११ हे संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाईची तरतूद करणारे कलम आहे. मोक्का कायद्याच्या धर्तीवर संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांना आळा घालण्यासाठी या कलमाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी केली आहे.

शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला करून कायद्याला आव्हान देणाऱ्या वाळू तस्करांच्या टोळीविरुद्ध संघटित गुन्हेगारीचे कलम लावण्यात आल्याने राहुरी तालुक्यात या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *