नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नियोजनातून रब्बी हंगामाला नवी उभारी; भंडारदरा, निळवंडेच्या आवर्तनाचा शेतकऱ्यांना दिलासा

लोणी, दि. २१ : यंदा अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि खरिपाच्या हंगामात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या नियोजनामुळे भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या आवर्तनाचा लाभ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. सिंचनासाठी वेळेत पाणी उपलब्ध झाल्याने गहू, हरभरा, कांदा, चारा आणि भाजीपाला पिकांना मोठा आधार मिळाला असून, संकटात सापडलेल्या रब्बी हंगामाला नवसंजीवनी मिळाली आहे.
भंडारदरा आणि निळवंडे हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे जलस्रोत आहेत. या दोन्ही धरणांमधून संगमनेर, अकोले, राहाता आणि श्रीरामपूर तालुक्यांतील शेतीला सिंचनाचा आधार मिळतो. यंदा लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने ग्रामीण भागासह शहरांमध्येही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. खरिपाचा हंगाम अपेक्षेप्रमाणे न झाल्याने शेतकऱ्यांचे लक्ष रब्बी हंगामातील आवर्तनाकडे लागले होते.ही परिस्थिती लक्षात घेऊन नामदार विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा विभागाने उपलब्ध पाणीसाठा, सिंचनाची गरज आणि लाभक्षेत्रातील मागणी यांचा विचार करून पाणी वितरणाचे नियोजन केले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकांमधून आवर्तनाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. त्यामुळे निळवंडेच्या डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे पाणी शेतापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. वेळेवर पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासह रब्बी हंगामाची तयारी करता आली.
जलसंपदा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नामदार विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देण्याबरोबरच उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी प्रभावी वापर करण्यावर भर दिला आहे. सिंचन प्रकल्पांची कार्यक्षमता वाढविणे, कालव्यांची देखभाल, पाणी वितरण व्यवस्था सुधारणे आणि शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचविणे या बाबींना प्राधान्य देण्यात आले. परिणामी पाण्याचा अपव्यय कमी करून आवर्तनाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.या आवर्तनाचा लाभ केवळ शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. अकोले, संगमनेर, श्रीरामपूर आणि राहाता तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमधील बंधारे भरून दिल्याने पाणीपुरवठा योजनांनाही दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात सुटण्यास मदत झाली आहे. चारापिकांसह रब्बी हंगामातील पिकांना पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यापूर्वीही उन्हाळी हंगामात लाभक्षेत्रातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी जलसंपदा विभागाने आवर्तनाचे नियोजन केले होते. उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर व्यवस्थापन आणि सिंचनाच्या गरजेला दिलेले प्राधान्य यामुळे यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीतही रब्बी हंगामाला आधार मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *