देश संसदेतूनच चालेल, परदेशातून नाही; धाक-दडपशाहीला जनता थारा देणार नाही : ना. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : ‘लोकतंत्र बचाव, भीडतंत्र हटाव’ महारॅली हे कोणतेही शक्तीप्रदर्शन नसून लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण करण्याचा निर्धार आहे. हा देश संविधानाच्या आधाराने आणि संसदेतून चालेल, परदेशातून नाही. विरोधकांच्या धाक-दडपशाहीला देशातील जनता थारा देणार नाही, असा ठाम इशारा जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या रॅलीचा समारोप दिल्लीगेट येथे जाहीर सभेने झाला. या वेळी सभापती प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार अक्षय कर्डिले, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराध्यक्ष अनिल मोहिते, नितीन दिनकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेत बोलताना मंत्री विखे पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, वर्षानुवर्षे देशात काँग्रेसची सत्ता असताना त्यांना संविधान दिन साजरा करावासा वाटला नाही; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेऊन संविधानाप्रती असलेला आदर दाखवून दिला. अहिल्यानगर जिल्हा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वेगळे नाते राहिले आहे. या भूमीतून काँग्रेसला इशारा देताना त्यांनी स्पष्ट केले की, देश संविधानाच्या आधारानेच पुढे जाईल, धाक-दडपशाहीने नाही.

मागील काही दिवसांत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी संविधानाच्या नावाखाली अराजक माजवून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. निवडणुकांतील सातत्यपूर्ण पराभवामुळे काँग्रेस नेते हतबल झाले असून त्यांच्या भूमिकेला कोणताही आधार राहिलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांत देशाने सर्वच क्षेत्रांत प्रगती केल्याने भारत महासत्तेकडे वाटचाल करत आहे आणि अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. मात्र काही परकीय शक्तींना हे सहन होत नसून त्यांच्या जोरावर देशाला बदनाम करण्याचे काम काँग्रेसकडून सुरू असल्याचे ते म्हणाले.

संविधान हातात घेऊन राहुल गांधी फिरत असले, तरी देशातील जनता दूधखुळी नाही. काँग्रेसने संविधानाची कशी पायमल्ली केली, हे जनतेला ठाऊक आहे. लोकसभेच्या मागील अधिवेशनांमध्ये महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेत काँग्रेस सहभागी झाली नाही. संविधानाच्या आधारे चर्चा करण्याची त्यांची मानसिकता नाही, याचाच अर्थ त्यांचा संविधान आणि संसदेवर विश्वास नाही. जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे, तोपर्यंत लोकशाहीची लढाई संसदेतच होईल; मात्र रस्त्यावर लढण्याची वेळ आल्यास भाजपचा कार्यकर्ता मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. गरिबांना न्याय, शेतकऱ्यांना सन्मान, युवकांना रोजगार आणि प्रत्येकाला विकासाची संधी देणारा विकसित भारत घडवण्यासाठी राजकारणापेक्षा राष्ट्रहित महत्त्वाचे असून संविधानाचा सन्मान राखत लोकशाही संस्थांवरील विश्वास दृढ करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या वेळी सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य लोकशाहीत परावर्तित झाले आहे. निवडणुकांत पराभव झाल्यानंतर विरोधी पक्षाची भूमिका बजावता आली पाहिजे; मात्र सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संविधानिक संस्थांची बदनामी सुरू आहे. जनतेचा विचार न करणाऱ्यांना चोख उत्तर देण्यासाठी ही रॅली असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात आ. मोनिका राजळे, आ. अक्षय कर्डिले आणि डॉ. सुजय विखे पाटील यांचीही भाषणे झाली.आभार डॉ. सुजय विखे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *