सहा वर्षांच्या पाठपुराव्याला यश; आप्पासाहेब ढूस यांच्याकडून आ. प्राजक्त तनपुरे यांचे आभार
राहुरी फॅक्टरी : देवळाली प्रवरा हद्दीतील राहुरी फॅक्टरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील नगर-मनमाड महामार्गावर शाळकरी मुलांसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्चाच्या लोखंडी पादचारी उड्डाणपुलाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. सहा वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर काम सुरू झाल्याने पालक व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांनी या कामासाठी सहकार्य केल्याबद्दल आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांचे आभार मानले.
देवळाली प्रवरा येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांनी १९ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अहिल्यानगर येथील प्रकल्प संचालक पी. बी. दिवान यांना निवेदन दिले होते. डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नगर-मनमाड महामार्ग ओलांडताना शाळकरी मुलांना सुरक्षितता मिळावी, यासाठी येथे लोखंडी पादचारी पुलाची निर्मिती करण्याची मागणी त्यांनी केली होती.
या मागणीसाठी ढूस यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर पुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, काही मंडळींनी काम बंद पाडण्यासाठी प्रयत्न केल्याने काही महिने काम रखडले होते.
त्यानंतर आप्पासाहेब ढूस यांनी विधान परिषद सदस्य आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या सहकार्याने या कामाला पुन्हा गती दिली. अखेर पुलाच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. या पुलामुळे महामार्ग ओलांडणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार असून, पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.