अहिल्यानगर : जिल्ह्यात अवैधरीत्या गुटखा, मावा व सुगंधित तंबाखू तयार करून विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबविली. तोफखाना, शेवगाव आणि श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पाच ठिकाणी छापे टाकून १३ आरोपींविरुद्ध पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून, ३ लाख ५ हजार ७५६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तीन पथके तयार केली. या पथकांनी १३ व १४ सप्टेंबर रोजी अवैध गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांची माहिती घेत संबंधित ठिकाणी छापे टाकले.
तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत २ लाख ७२० रुपये, शेवगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन कारवायांमध्ये अनुक्रमे ५४ हजार, २ हजार ५९२ आणि ४१ हजार १०९ रुपये, तर श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७ हजार ३३५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून काही आरोपी फरार आहेत. संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, कृष्णकुमार सेदवाड तसेच पोलीस अंमलदारांनी केली.