लोणी (प्रतिनिधी) : सहकारी साखर कारखान्यांना बायो-सीबीजी प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणारे पाठबळ हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या प्रकल्पामुळे देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्यास मदत होण्याबरोबरच शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील, असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने केंद्र सरकारच्या गोवर्धन योजनेअंतर्गत प्रतिदिन १६ टन क्षमतेचा बायो-सीबीजी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, व्हाइस चेअरमन सोपानराव शिरसाठ, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, नंदूशेठ राठी, मकरंद गुणे, मच्छिंद्र थेटे, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्यासह शेतकरी, सभासद व अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाच लाख रुपयांचा धनादेश दुष्काळ सहाय्यता निधीसाठी शासनाकडे सुपूर्द करण्यात आला.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, विखे पाटील कारखान्याने बायो-सीबीजी प्रकल्प उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. शेतातील वाया जाणाऱ्या कृषी अवशेषांचा वापर करून या प्रकल्पातून ऊर्जानिर्मिती केली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कचऱ्याचे ऊर्जेत रूपांतर करण्याचा हा प्रयत्न देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ऊर्जा स्वावलंबन आणि पर्यावरणपूरक विकासाचे उद्दिष्ट दिले असून, हरित ऊर्जानिर्मितीमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त साधन उपलब्ध होईल.
कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून कारखान्याचे विस्तारीकरण पूर्ण झाले असून, अत्यंत कमी कालावधीत हे काम झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. नव्या प्रकल्पामुळे कारखान्याच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचे सांगत, भविष्यात साखर कारखानदारीचे अर्थकारण सक्षम ठेवण्यासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादनवाढीला प्राधान्य द्यावे लागेल, असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून सहकारी साखर कारखानदारीला मोठे पाठबळ मिळत आहे. नव्या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी हिताला प्राधान्य दिले जाणार आहे. एक लाख टन ऊस गाळप पूर्ण करणारा आपला कारखाना राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी कारखान्याने गळीत हंगामासाठी केलेल्या नियोजनाचे कौतुक केले. सहकारी साखर कारखानदारीसमोर अनेक आव्हाने असली, तरी आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या प्रयोगांच्या माध्यमातून ही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. सामूहिक प्रयत्नांना मिळणारी साथ हीच सहकाराच्या यशाची गुरुकिल्ली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.