काँग्रेसच्या फेक नॅरेटिव्हला रस्त्यावर उतरून उत्तर देणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील; मोर्चा यशस्वी करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : काँग्रेसकडून देशात जाणीवपूर्वक फेक नॅरेटिव्ह पसरवून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहिल्यानगर शहरात १६ नोव्हेंबर रोजी ‘लोकशाही बचाव, भीडतंत्र हटाव’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मोर्चाच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सभापती राम शिंदे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराध्यक्ष अनिल मोहिते, बाबासाहेब वाकळे, निखिल वारे, विनायक देशमुख, प्रा. विश्वनाथ कोरडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने काँग्रेसकडून देशात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी संविधान हातात घेतात; मात्र संविधानाचा आदर करण्याची त्यांची तयारी नाही. संसदेतील चर्चेला सामोरे जाण्याऐवजी फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून देशात संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
तीन निवडणुकांमध्ये पराभव होऊनही काँग्रेस नेतृत्व आत्मपरीक्षण करण्यास तयार नाही. काही राज्यांमध्ये विजय मिळाला की ईव्हीएम योग्य असल्याचे सांगायचे आणि पराभव झाला की निवडणूक आयोगावर आरोप करायचे, ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका असल्याची टीका त्यांनी केली. तसेच सीजेपीला पुढे करून काँग्रेस राजकीय स्वार्थ साधत असल्याचा आरोप करत सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या निमित्तानेही त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
सभापती राम शिंदे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कामाचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार असल्याच्या अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्यात आली. काँग्रेसच्या रस्त्यावरील आंदोलनाला भाजप कार्यकर्त्यांनीही तितक्याच ताकदीने उत्तर द्यावे. अहिल्यानगरचा मोर्चा राज्यात लक्षवेधी ठरेल, असे नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. सुजय विखे पाटील यांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मिळालेले पद हे पक्षातील सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या योगदानाचे फलित असल्याची भावना डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केली. बैठकीचे प्रास्ताविक शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले.