राहुरीच्या संतोष तनपुरे यांची दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय सीईओ क्लब कन्व्हेंशनसाठी निवड

अहिल्यानगर शाखेतील तीन प्रतिनिधींमध्ये स्थान; राहुरी तालुक्यातील एकमेव सीईओ क्लब क्वालिफायर

राहुरी (प्रतिनिधी) : आरोग्य विमा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राहुरी येथील संतोष एन. तनपुरे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी घेतली आहे. स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनीच्या वतीने दक्षिण कोरिया येथे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सीईओ क्लब कन्व्हेंशनसाठी त्यांची निवड झाली आहे. अहिल्यानगर शाखेतून निवड झालेल्या तीन प्रतिनिधींमध्ये त्यांनी स्थान मिळवले असून, राहुरी तालुक्यातील ते एकमेव सीईओ क्लब क्वालिफायर ठरले आहेत.

तनपुरे गेल्या दहा वर्षांपासून आरोग्य विमा क्षेत्रात कार्यरत आहेत. सातत्यपूर्ण मेहनत, उत्कृष्ट व्यावसायिक कामगिरी आणि ग्राहकाभिमुख सेवेमुळे त्यांनी या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नागरिकांमध्ये आरोग्य विम्याबाबत जनजागृती करणे, कुटुंबांना आर्थिक सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देणे तसेच विमा पॉलिसीधारकांना क्लेम प्रक्रियेत आवश्यक सहकार्य करणे, या माध्यमातून त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.

केवळ विमा पॉलिसी विक्रीपुरते मर्यादित न राहता ग्राहकांना गरजेच्या वेळी सेवा आणि मार्गदर्शन देण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या याच कामगिरीची दखल घेत कंपनीने त्यांची आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशनसाठी निवड केली आहे.

दक्षिण कोरिया येथील या प्रतिष्ठित कन्व्हेंशनमध्ये सहभागी होण्याची संधी म्हणजे त्यांच्या दहा वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. त्यांच्या या निवडीमुळे राहुरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *