कर्णकर्कश डीजे मालकासह मंडळाचे अध्यक्षावर श्रीरामपुरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीत पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टीम वाजविल्याप्रकरणी शिवराजे युवा मित्र मंडळाच्या अल्पवयीन अध्यक्षासह शिवाज्ञा साऊंड सिस्टीमचे मालक निलेश दगडू पाटील यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत साऊंड सिस्टीम जप्त करण्यात आली असून, आरटीओमार्फत साऊंड सिस्टीम मालकास १५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक ३, बालिका विद्यालयाजवळील शिवसर्कल चौकात शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी ७ ते रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान गणेशमूर्ती आगमन मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी टाटा एस ट्रक (क्र. एमएच ४६ एएफ ६५८०) वर साऊंड सिस्टीम लावून मोठ्या आवाजात गाणी वाजविण्यात येत होती. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत होते.

मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस अधिकारी व अंमलदारांनी साऊंडचा आवाज कमी करण्याच्या सूचना संबंधितांना वारंवार दिल्या. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करून मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ८९३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम २२३, २७०, २९२ तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी साऊंड सिस्टीम जप्त केली असून, आरटीओ श्रीरामपूर यांच्या माध्यमातून मालकास १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाईत API रामचंद्र शिखरे, PSI आप्पासाहेब हंडाळ, सफौ. दीपक कदम, पोकॉ. मच्छिंद्र कातखडे, पोकॉ. अजित पटारे, पोकॉ. पंकज सानप व पोकॉ. ज्ञानेश्वर वाघमोडे यांनी सहभाग घेतला. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोकॉ. पांडुरंग चौधरी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *