समृद्धी महामार्गावरील दरोड्याचा स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश; चौघांना अटक

अहिल्यानगर : समृद्धी महामार्गावरील पोल क्रमांक ५०८ येथे आयशर वाहन दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिकला चाकूचा धाक दाखवून मारहाण करत मोबाईल व रोख रक्कम लुटल्याच्या दरोड्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार दिवसांत उघडकीस आणला. या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीचे दोन मोबाईल, दोन हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दिनांक ८ सप्टेंबर रोजी पहाटे सव्वा एकच्या सुमारास अभिषेक मच्छिंद्र गायकवाड (वय २०, रा. पिंपळवाड रोड, साकुरी, ता. राहाता) हे समृद्धी महामार्गावरील पोल क्रमांक ५०८ येथे आयशर कंपनीचे वाहन दुरुस्त करीत होते. यावेळी सहा अज्ञात व्यक्तींनी त्यांना व साक्षीदारांना चाकूचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन आरोपी पसार झाले. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९६/२०२६, बीएनएस कलम ३१०(२), ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.

पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोउपनि संदीप दरवडे, अनंत सालगुडे, विकास जाधव तसेच पोलिस अंमलदार रणजीत जाधव, अरुण गांगुर्डे, निळकंठ कारखेले, विष्णू भागवत, सोमनाथ झांबरे, विजय पवार, राहुल डोके, प्रकाश मांडगे, मनोज साखरे, बाळासाहेब खेडकर, अमृत आढाव, किशोर शिरसाठ, सुनील मालणकर, भगवान थोरात, रिचर्ड गायकवाड, महादेव भांड, गणेश धोत्रे, सुनील पवार, रमीजराजा आतार, अजिनाथ पाखरे, विशाल तनपुरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड व भगवान धुळे यांची चार पथके तयार केली.

तपास पथकांनी घटनास्थळी पाहणी करून गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेतली. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि समृद्धी महामार्गावरील तब्बल १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजचे विश्लेषण करण्यात आले. चार दिवसांच्या अथक तपासानंतर ११ सप्टेंबर रोजी पथकाला आरोपी कोकमठाण गावच्या शिवारात, समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ मोटारसायकलसह थांबले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून धनंजय उर्फ धनु प्रकाश काळे (वय २७), स्वप्नील संतोष भारूड (वय २०), प्रशांत जालिंदर भारूड (वय २०) आणि शिवरंजन राजेश शिंदे (वय २२) या चौघांना ताब्यात घेतले.

चौकशीत धनंजय उर्फ धनु काळे याने साथीदारांसह दरोडा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामध्ये चंदू नारायण तहकीक (रा. सावळीविहीर, ता. राहाता) आणि नाव माहित नसलेला आणखी एक साथीदार सहभागी असल्याची माहिती समोर आली असून, हे दोघे सध्या फरार आहेत.

आरोपींकडून गुन्ह्यात चोरी केलेले दोन मोबाईल, दोन हजार रुपये रोख आणि ८० हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची प्लेझर/प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एमएच-१७-डीपी-३२१३ असा एकूण १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, धनंजय उर्फ धनु काळे व स्वप्नील भारूड हे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. धनु काळे याच्यावर दरोडा, घरफोडी, चोरी आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. स्वप्नील भारूड याच्यावरही चोरी, मारहाण आणि अन्य गुन्हे दाखल आहेत.

ताब्यात घेतलेल्या आरोपींना मुद्देमालासह कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास कोपरगाव तालुका पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *