श्रीरामपूर : शहर व परिसरातील वाहन चोरीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी बेकायदा भंगार दुकानांची तपासणी करून विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर कारवाई केली. शकील इब्राहीम शहा (४९, रा. पाण्याच्या टाकीजवळ, वार्ड क्रमांक २) आणि सुलेमान दादामिया शहा (४५, रा. संजयनगर, वार्ड क्रमांक २, श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशानुसार ११ ऑगस्ट रोजी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ऑल आऊट ऑपरेशन व विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी कोंबिंग ऑपरेशन करून शहरातील भंगार दुकानांची बारकाईने तपासणी करण्यात आली. चोरीची वाहने भंगार दुकानांमध्ये बेकायदा विकली जात असल्याच्या संशयावरून ही तपासणी करण्यात आली.
गोपीनाथनगर, वार्ड क्रमांक २ येथील शकील शहा यांच्या भंगार दुकानात आल्टो, स्विफ्ट, टाटा सुमो, टाटा मॅजिक, इंडिका यांसह दहा वाहने आढळून आली. तर सुलेमान शहा यांच्या दुकानात वॅगनर, आल्टो व ओमिनी अशा चार वाहनांचा समावेश होता. आसिफ हारुण शहा यांच्या दुकानातही तीन वाहने आढळली.
पोलिसांनी संबंधित दुकानदारांकडे वाहनांची कागदपत्रे व मालकी हक्काबाबत माहिती मागितली. त्यावेळी आसिफ शहा यांनी दिलेला खुलासा समाधानकारक आढळला. मात्र शकील शहा व सुलेमान शहा यांनी त्यांच्या ताब्यातील वाहनांबाबत मालकी हक्काचा ठोस पुरावा सादर केला नाही.
तपासात संबंधित वाहनांच्या मालकीबाबत पुरावे उपलब्ध नसल्याचे तसेच वाहने स्क्रॅप करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाची आवश्यक परवानगी घेण्यात आली नसल्याचे निष्पन्न झाले. वाहनांचे चेसिस व इंजिन क्रमांक आरटीओकडे जमा न करता तसेच शासनाचा कर न भरता नियमांचा भंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३, ३१८ (४) व ३०३ (२) अन्वये १० सप्टेंबर रोजी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
भंगार दुकानदारांनी दुकानात येणाऱ्या प्रत्येक जुन्या वाहनाची इंजिन व चेसिस क्रमांकासह रजिस्टरमध्ये नोंद ठेवावी. वाहन खरेदी करताना आरसी बुक, खरेदीखत व विक्रेत्याचे ओळखपत्र तपासावे. आरटीओची अधिकृत परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही वाहन स्क्रॅप करू नये. विना नंबरचे अथवा संशयास्पद वाहन कमी किमतीत विक्रीस आणल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांनीही वाहनाचा चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांक आणि मालकी हक्काची कागदपत्रे तपासूनच व्यवहार करावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विशाल खैरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र शिखरे, पोलिस उपनिरीक्षक रोशन निकम, आप्पासाहेब हंडाळ, उमेश चव्हाण, शितल मुगडे तसेच श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याच्या अंमलदारांनी ही कारवाई केली.