गावठी शस्त्र विक्री प्रकरणात टोळीचा म्होरक्या देवळाली प्रवरातून जेरबंद


राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे :

गावठी शस्त्र विक्री प्रकरणाचा तपास करताना वाळूज पोलिसांनी आणखी एक महत्त्वाची कारवाई करत शस्त्र पुरवठा करणारा अट्टल गुन्हेगार सचिन घोरपडे याला राहुरी तालुक्यातील देवळाली येथून अटक केली. तपासादरम्यान घोरपडे हा या शस्त्र विक्री टोळीचा प्रमुख असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणात यापूर्वी राहुल गायकवाड, सिद्धार्थ धनेधर आणि शाहरुख सांडू सय्यद यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत टोळीचा म्होरक्या असलेल्या सचिन घोरपडेपर्यंत धागेदोरे पोहोचवले.

अटक करण्यात आल्यानंतर घोरपडे याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची हर्सूल मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार जेरबंद करण्यासाठी वाळूज पोलिसांनी सातत्याने व अहोरात्र मेहनत घेत तपासाची चक्रे फिरवली. पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रेशीम कोळेकर, सहायक फौजदार सुखदेव भागडे तसेच पोलीस अंमलदार विजय पिंपळे, सुखदेव कोल्हे आणि विजय त्रिभुवन यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *