श्रीगोंदा तालुक्यात खंडणी व जबरी चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

फरार आरोपी प्रतिक गोकुळ पाचपुतेला शिंगवे तुकाई परिसरातून ताब्यात घेतले

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार ते पिसोरे खांड रस्त्यावर एका व्यक्तीला अडवून काठी व लोखंडी टॉमीने मारहाण करत ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी फरार असलेल्या मुख्य आरोपीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. प्रतिक गोकुळ पाचपुते (वय २५, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. शिंगवे तुकाई (ता. नेवासा) परिसरात सापळा रचून गुरुवारी (दि. १७) ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ सप्टेंबर रोजी विजय भाऊसाहेब शेळके (वय ४१, रा. गुणवडी, ता. अहिल्यानगर) हे श्रीगोंदा येथून घरी जात असताना टाकळी लोणार ते पिसोरे खांड रस्त्यावर प्रतिक पाचपुते व त्याच्या साथीदारांनी त्यांना व साक्षीदारांना अडविले. आरोपींनी काठी व लोखंडी टॉमीने मारहाण करून ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील रोख रक्कम जबरीने काढून घेतली.

या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खंडणीसह जबरी चोरीचा गुन्हा असल्याने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दोन पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. बातमीदारांकडून मिळालेली माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सातारा, सांगली, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत आरोपीचा शोध घेतला. मात्र, आरोपी वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या.

दरम्यान, प्रतिक पाचपुते हा शिंगवे तुकाई परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी आरोपीला श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनांनुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड व पोलीस अंमलदार अतुल लोटके, राहुल द्वारके, निळकंठ कारखेले, शाहीद शेख, बाळासाहेब नागरगोजे, अजिनाथ पाखरे, अमोल कोतकर, प्रताप देवकाते, सागर ससाणे, मनोज साखरे अशा पोलीस अंमलदारांनी हि कामगिरी केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *