अहिल्यानगरात २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण; रविवारी बोल्हेगाव फाटा येथे भव्य सोहळा

अहिल्यानगर, प्रतिनिधी : बोल्हेगाव फाटा परिसरातील संत तुकाराम नगर येथील दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्रात रविवारी (दि. २६ जुलै) सकाळी ८ ते ११ या वेळेत २५ हजार भाविकांच्या उपस्थितीत सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर काका लोळगे यांच्या पुढाकारातून हा भव्य आध्यात्मिक उपक्रम आयोजित करण्यात आला असून, जिल्ह्यासह परजिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

सुमारे २५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या स्वामी समर्थ सेवा केंद्राने अध्यात्मासोबतच समाजप्रबोधनाचे कार्यही सातत्याने केले आहे. सुरुवातीला परिसरात विरळ वस्ती असल्याने भाविकांची संख्या मर्यादित होती. मात्र कालांतराने स्वामींच्या सेवेसाठी येणाऱ्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.

व्यसनाधीनता आणि नैराश्याकडे झुकणाऱ्या अनेक तरुणांना स्वामींच्या विचारांची प्रेरणा मिळाली. अनेकांनी व्यसनांचा त्याग करून उद्योग-व्यवसाय, शिक्षण आणि नोकरीच्या क्षेत्रात यश संपादन केले. केंद्रातील बालसंस्कार विभागासह विविध १८ विभागांच्या माध्यमातून सामाजिक आणि आध्यात्मिक संस्कार घडविण्याचे कार्य प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

बोल्हेगाव परिसरातील नागरी वस्ती वाढल्यामुळे या केंद्रात गुरुवार आणि रविवारी भाविकांची विशेष गर्दी होत असते. जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनही अनेक भक्त स्वामींच्या दर्शनासाठी आणि सेवेसाठी येथे येतात. अनेकांना स्वामींच्या कृपेची अनुभूती मिळाल्याने केंद्रावरील श्रद्धा दिवसेंदिवस वाढत असल्याचे चंद्रशेखर काका लोळगे यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळ्यात आबालवृद्धांसह सर्व वयोगटातील भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रशेखर काका लोळगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *