राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : विश्वास, पारदर्शक कारभार आणि ग्राहकाभिमुख सेवेमुळे ओळख निर्माण केलेल्या राहुरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ने २०० कोटी रुपयांच्या ठेवींचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या यशामुळे ठेवीदार, सभासद, हितचिंतक तसेच संस्थेच्या अधिकारी-कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष शिवाजीराव कपाळे (आप्पा) यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि पिग्मी एजंट यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने संस्था सातत्याने कार्यरत असून, त्याचाच परिपाक म्हणून २०० कोटी ठेवींचा मानाचा टप्पा गाठता आल्याचे नमूद करण्यात आले.
संस्थेचे एकूण कर्जवाटप १५२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असून, एकूण व्यवसाय ३५२ कोटी रुपयांचा झाला आहे. यामध्ये सोनेतारण व ठेवतारण कर्जाचा वाटा १२२ कोटी रुपयांचा असून, संस्थेची गुंतवणूक ४८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
स्पर्धात्मक आर्थिक वातावरणात ठेवीदारांचा विश्वास टिकवून ठेवणे हे सहकारी संस्थांसमोरील मोठे आव्हान असते. मात्र, पारदर्शक कारभार, शिस्तबद्ध आर्थिक व्यवस्थापन, ग्राहकाभिमुख सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्व या तत्त्वांमुळे साई आदर्श मल्टीस्टेटने नागरिकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे २०० कोटी ठेवींचा टप्पा हा केवळ आर्थिक यश नसून सहकाराच्या मूल्यांवर उभारलेल्या संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीचा आणि लोकविश्वासाचा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
यापुढील काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल सेवांचा विस्तार आणि समाजोपयोगी उपक्रमांवर भर देत संस्थेची प्रगती अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे म्हणाले, “२०० कोटी ठेवींचा टप्पा हा केवळ आर्थिक आकडा नसून सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. श्री साईबाबांच्या कृपेने आणि सर्वांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाले. यापुढेही पारदर्शकता, सेवाभाव आणि प्रामाणिकतेच्या बळावर अधिक सुरक्षित व विश्वासार्ह आर्थिक सेवा देण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील.”