राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : ग्रामीण भागातील तीव्र पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसह जलजीवन मिशनअंतर्गत रखडलेल्या योजनांच्या निषेधार्थ पाणी हक्क संघर्ष समिती, राहुरी यांच्या वतीने सोमवारी (दि. २० जुलै) प्रतीकात्मक ‘भीक मागो आंदोलन’ करण्यात येणार असल्याची माहिती समितीने दिली आहे.
समितीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार, दि. २२ जून रोजी राहुरी पंचायत समिती व तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी वावरथ, चिंचाळा, बुळे पठार, वरशिंदे, चिखलठाण, जांभळी आणि सात्रळ येथील पिण्याच्या पाण्याच्या समस्यांबाबत संबंधित ग्रामसेवकांकडून प्रस्ताव मागवून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, अनेक दिवस उलटूनही या प्रस्तावांवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप समितीने केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट व संघर्ष करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत अनेक गावांतील पाणीपुरवठा योजनांची कामे निधीअभावी रखडल्याचे कारण प्रशासनाकडून सातत्याने सांगितले जात आहे. दरम्यान, या योजनेतील कथित गैरव्यवहारांप्रकरणी काही अधिकारी निलंबित करण्यात आले असून लोकप्रतिनिधींनाही या विषयावर भूमिका घ्यावी लागली आहे. तरीही प्रत्यक्षात बंद पडलेली कामे सुरू होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे समितीने म्हटले आहे.
याच पार्श्वभूमीवर, “ग्रामीण भागाला पिण्याचे पाणी देण्यासाठी सरकारकडे निधी नसेल, तर जनतेकडून भीक मागून तो निधी सरकारला पाठवू,” या प्रतीकात्मक भूमिकेतून ‘भीक मागो आंदोलन’ करण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे ग्रामीण भागातील पाणीटंचाईकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून रखडलेल्या योजनांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार आहे.
या आंदोलनात नागरिक, शेतकरी, महिला, युवक, सामाजिक संघटना तसेच सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पाणी हक्क संघर्ष समितीने केले आहे.
प्रमुख मागण्या :
रखडलेल्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी तातडीने निधी उपलब्ध करावा.
जलजीवन मिशनची बंद पडलेली कामे त्वरित सुरू करावीत.
गैरव्यवहारातील संबंधित ठेकेदार व दोषींवर कठोर कारवाई करावी.
ग्रामीण नागरिकांना नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.
निवेदन सादर करताना निखिल साळवे, देवराम जाधव, आयु. मधुकर विधाटे, श्रीराम विधाटे, रावसाहेब बर्डे, आदित्य साळवे, अक्षय बर्डे, डॉ. जालिंदर घिगे आदी पाणी हक्क संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.