फलटण : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने डराडो (DARADO NGO) या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने फलटण येथे वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट आणि पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप करण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत सुरू असलेल्या या सेवाभावी उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या अखंड जयघोषात भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमात संस्थेच्या स्वयंसेवकांनी ‘वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून दिवसभर निस्वार्थपणे सेवा बजावली. हजारो वारकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेत संस्थेच्या सेवाभावाचे कौतुक केले.
या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. संस्थेचे विश्वस्त डॉ. महेशकुमार धोंडीराम खरात आणि ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी देणगीदार, स्वयंसेवक तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले.
उपक्रमात फुले, श्रीमती शिंदे, नाळे, शिंदे, सोनावणे बंधू, अडसूळ, सनी, पारसे, खरात, कणसे यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून हा सेवा उपक्रम यशस्वी झाला.
सामाजिक बांधिलकी जपत भविष्यातही समाजोपयोगी आणि लोकहिताचे उपक्रम राबविण्याचा मानस संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.