राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : केंद्र व राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राहुरी नगरपरिषदेने शुक्रवारी शहरात धडक कारवाई केली. मुख्याधिकारी अभिजित हराळे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर व साठा करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ७१ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठ, नवीपेठ, पृथ्वी कॉर्नर तसेच नगर-मनमाड रोड परिसरातील घाऊक व किरकोळ दुकानांची अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान शासनाने बंदी घातलेल्या सिंगल युज प्लास्टिकचा वापर व साठा आढळून आलेल्या व्यावसायिकांविरुद्ध नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी प्लास्टिक बंदीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करताना, पर्यावरण संवर्धनासाठी नागरिक व व्यापाऱ्यांनी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे, असे सांगितले. भविष्यातही अशा धडक मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या मोहिमेत मुख्याधिकारी अभिजीत हराळ यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या वसुली विभाग तसेच आरोग्य व सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. संतोष डागवाले, बाळासाहेब पवार, गणेश यादव, सोमनाथ गायकवाड, बाळासाहेब कचरे आणि अनिल जाधव यांनी प्रत्यक्ष कारवाईत सहभाग नोंदविला.
h29z0v
s4r3gz