राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे: आई-वडील दोघेही नसताना केवळ आर्थिक अडचणीमुळे शिक्षण थांबण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मुसळवाडी येथील एका अनाथ विद्यार्थिनीला समाजाने दिलासा दिला. सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब भिमराज ढूस यांच्या आवाहनाला दानशूरांनी अवघ्या पाच मिनिटांत प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला. त्यातून राजर्षी शाहू महाविद्यालयात बीएससी प्रथम वर्षासाठी आवश्यक शुल्काची व्यवस्था झाली आणि विद्यार्थिनीचा प्रवेश बुधवारी (दि. १५) निश्चित झाला.
आरती (नाव बदलले आहे) हिचे वडील ती अवघी चार वर्षांची असतानाच वारले. आईने मोलमजुरी करून मुलीचे शिक्षण सुरू ठेवले. मात्र दहावी-बारावीदरम्यान आई गंभीर आजारी पडली आणि बारावीच्या परीक्षेपूर्वीच तिचे निधन झाले. या कठीण परिस्थितीतही आरतीने बारावी उत्तीर्ण होत पुढील शिक्षणाची जिद्द कायम ठेवली. मात्र घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने महाविद्यालयीन प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला.
आरतीच्या आईचे माहेर देवळाली प्रवरा येथे आहे. तिची आजी वाल्हुबाई यांनी आपली व्यथा नगरसेवक सचिन शेटे यांच्यासमोर मांडली. त्याच दिवशी बीएससी प्रवेशाची अंतिम मुदत होती आणि २२ हजार ४७५ रुपये शुल्क भरणे आवश्यक होते. सचिन शेटे यांनी तातडीने राहुरी तालुका वात्सल्य समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांच्याशी संपर्क साधला.
शासकीय मदतीची वाट न पाहता ढूस यांनी विविध व्हॉट्सअॅप समूहांवर आरतीची माहिती देत मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला काही मिनिटांतच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देवळाली प्रवरा येथील ओम शांती केंद्राच्या विजया दीदी यांनी सहकार्याचे आश्वासन दिले, तर मुंबईतील एका संस्थेने पुढील शिक्षणासाठी दरवर्षी ९५ टक्के शुल्क उचलण्याची तयारी दर्शविली.
दरम्यान, विविध दानशूरांनी तातडीने १५ हजार ७२५ रुपये जमा केले. त्यानंतर आप्पासाहेब ढूस, सचिन शेटे, शरद खांदे आणि आरती यांनी राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्या स्वाती हापसे यांची भेट घेतली. हापसे यांनी उर्वरित शुल्कात सवलत देत सहकार्य केले. त्यामुळे आरतीचा बीएससी प्रथम वर्षाचा प्रवेश निश्चित झाला.
यावेळी आप्पासाहेब ढूस म्हणाले, “केवळ फीअभावी कोणत्याही मुलीचे शिक्षण थांबू नये, हीच भावना या उपक्रमामागे होती. समाजाने दिलेला तातडीचा प्रतिसाद प्रेरणादायी आहे.”
आरतीनेही सर्व मदतकर्त्यांचे आभार मानत आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनापासून शिक्षण घेण्याचा निर्धार व्यक्त केला.