स्मार्ट मीटर बसविणे थांबवा; महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : ॲड. खरात

फलटण : महावितरणकडून राज्यभर राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेवर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यभर वीज ग्राहकांच्या घरांतील सुरू असलेले मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असून, त्यासाठी ग्राहकांना संदेश पाठविले जात आहेत. मात्र, स्मार्ट मीटरबाबत विविध शंका उपस्थित झाल्यानंतर त्याला देशभर विरोध झाला होता. तसेच स्मार्ट मीटर बसविण्याबाबत सक्ती नसल्याचे राज्य सरकारकडूनही स्पष्ट करण्यात आले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
केंद्र किंवा राज्य सरकारचा स्पष्ट आदेश नसताना महावितरणचे अधिकारी कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार स्मार्ट मीटर बसवित आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी संसदीय निर्णयांचा अवमान केल्याचा आरोप करत त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत किंवा कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याशिवाय, राज्य सरकारने स्मार्ट मीटरची बसविण्याची मोहीम तात्पुरती थांबवून उपलब्ध सर्व स्मार्ट मीटर सरकारी ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, जेणेकरून शासनाच्या पुढील आदेशाशिवाय त्यांचा वापर होणार नाही, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या प्रकरणाची न्यायालयाने स्वतःहून दखल (सुमोटो) घ्यावी तसेच राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाला संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही ॲड. खरात यांनी केली आहे. या वेळी सौ. रेश्मा पठाण उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *