राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : राहुरी तालुक्यातील आरडगाव उपकेंद्रातून निघणाऱ्या शिलेगाव व मुसळवाडी या दोन फिडरवरील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे संचालक व मुख्य अभियंता यांच्यासोबत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली. या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
बैठकीत आरडगाव येथील काळे वस्ती व इंगळे वस्ती परिसरातील शेतकरी लाभार्थ्यांना आरडगाव येथील सौरऊर्जा प्रकल्पातून वीजपुरवठा सुरू करण्याबाबतही चर्चा झाली. त्यासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
राहुरी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध वीज समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, दिवसा वीजपुरवठा आणि सौरऊर्जा प्रकल्पातून वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.