श्रीरामपूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या उद्देशाने अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथील अपर पोलिस अधीक्षक कार्यालयात शनिवारी (४ जुलै) विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत श्रीरामपूर विभागातील १४ पोलिस ठाण्यांतील १२१ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची ओळख परेड, समुपदेशन व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोहिमेत खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, शरीराविरुद्धचे गुन्हे तसेच आर्म अॅक्टसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना हजर करण्यात आले. श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील सर्वाधिक ३५, कोपरगाव शहर १७, संगमनेर शहर ११, राहाता १०, श्रीरामपूर तालुका ६, राजूर ६, लोणी व अकोले प्रत्येकी ५, राहुरी, नवासा व सानाई प्रत्येकी ४, शिर्डी व कोपरगाव तालुका प्रत्येकी १ अशा एकूण १२१ आरोपींची नोंद झाली.मोहिमेदरम्यान आरोपींकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. त्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२९ अन्वये प्रत्येकाकडून दोन लाख रुपयांचा प्रतिबंधात्मक बाँड भरून घेण्यात आला. पुढील दोन वर्षांत पुन्हा गुन्हा केल्यास ही रक्कम शासनाकडे जमा होईल, तसेच आवश्यक असल्यास न्यायालयीन कोठडीसह कठोर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट सूचना पोलिसांनी दिली.यावेळी आरोपींना पुन्हा गुन्हेगारीकडे वळल्यास पूर्वीचा जामीनही रद्द होऊ शकतो, तडीपार किंवा मोक्का सारख्या कठोर कायद्यांनुसार कारवाई होऊ शकते, असे समजावून सांगण्यात आले. तसेच सोशल मीडियावर भांडणाचे किंवा गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे व्हिडीओ प्रसारित न करण्याच्या, तसेच गुन्हेगारीविषयी माहिती असल्यास पोलिसांना कळविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.ही मोहीम पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर (श्रीरामपूर), कुणाल सोनवणे (संगमनेर), अमोल भारती (शिर्डी) आणि निरज राजगुरू (शेवगाव) तसेच उत्तर अहमदनगर विभागातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी राबविली.