आ. अक्षय कर्डीले यांच्या पाठपुराव्याला यश; पिंपळगाव माळवीत दिवसा वीजपुरवठा सुरू

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : पिंपळगाव माळवी परिसरातील शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या दिवसा वीजपुरवठ्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात आलेला ५ केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आला असून, आमदार अक्षय कर्डीले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

परिसरातील शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार आमदार अक्षय कर्डीले यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत त्यांनी महावितरण प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ट्रान्सफॉर्मर अधिकृतपणे सुरू करण्यात आला.

यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत प्रशासक, सदस्य तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधेमुळे आता शेतकऱ्यांना सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत शेतीपंपांसाठी दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सिंचन व्यवस्थेला चालना मिळून शेतीची कामे अधिक सुलभ होणार असून, उत्पादनवाढीस मदत होईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी शेतकरी व ग्रामस्थांनी आमदार अक्षय कर्डीले यांच्यासह महावितरणचे जाधव, चव्हाण, सपकाळ, शिंदे तसेच वायरमन बाबासाहेब झिने यांचे आभार मानले.

पिंपळगाव माळवी परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिवसा वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध झाल्याने सिंचन व्यवस्थेला बळ मिळणार असून, ग्रामीण भागातील वीज समस्येच्या निराकरणाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *