श्रीरामपूर : तब्बल दहा वर्षांपासून न्यायालयाच्या अटक वॉरंटपासून फरार असलेल्या आरोपीला श्रीरामपूर शहर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. गुप्त माहितीच्या आधारे वळदगाव शिवारातून आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फरार, पाहिजे तसेच न्यायालयाकडून अटक वॉरंट बजावण्यात आलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत प्रथमवर्ग न्यायालय, श्रीरामपूर (कोर्ट क्र. १) येथील आर.सी.सी. क्रमांक २७९/२०१५ मधील आरोपी रामभाऊ शिवाजी निकम (रा. वळदगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याचा शोध सुरू होता. तो गेल्या दहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत वास्तव्य लपवून राहत होता.
दरम्यान, आरोपी वळदगाव शिवारात आल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना मिळाली. त्यांनी तातडीने वॉरंट पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
श्रीरामपूर शहर पोलिसांकडून फरार, पाहिजे तसेच न्यायालयीन अटक वॉरंट असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या नेतृत्वाखाली वॉरंट पथकातील सफौ. प्रसाद साळवे, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण देमीवाल व राहुल पौळ यांनी केली.