राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : राहुरी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि जनावरांच्या चाऱ्याची निर्माण झालेली टंचाई लक्षात घेता, तालुक्यातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे सुरू असलेले ऊस गाळप तातडीने बंद करण्यात यावे, अशी मागणी राहुरी न्यायालयातील वकील अॅड. रामदास धुराजी बाचकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदार, राहुरी यांना टपालाद्वारे निवेदन पाठविले असून, ते जिल्हाधिकारी व पालकमंत्री, अहिल्यानगर यांच्याकडे पाठविण्याची विनंती केली आहे.
राहुरी तालुक्यातील काही भाग बागायती, तर काही भाग डोंगराळ व जिरायती आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी शेतीसोबत दुग्ध व्यवसाय करतात. दुभत्या जनावरांच्या पालनावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे विशेषतः डोंगराळ भागात जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई जाणवत आहे. अद्याप राहुरी तालुक्यात चारा छावण्यांना मंजुरी मिळालेली नसल्याने पशुपालकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.