१५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान दांडियाचा जल्लोष; १९ ऑक्टोबरला ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम
राहुरी : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून नाथ प्रतिष्ठानच्या वतीने राहुरीत महिलांसाठी रास दांडिया महोत्सव आणि ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विद्यामंदिर प्रशालेच्या मैदानावर रास दांडियाचा जल्लोष रंगणार असून, १९ ऑक्टोबरला ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम होणार आहे. झी मराठी फेम सिनेअभिनेते ओम यादव हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.राहुरी तालुक्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात महिलांना मनोरंजनासह विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. विद्यामंदिर प्रशालेच्या मैदानावर दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत रास दांडिया महोत्सव रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी महिलांना विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला आहे.
१९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ कार्यक्रमात सहभागी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांसह आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्या महिलेला इलेक्ट्रिक स्कूटी, द्वितीय क्रमांकाला एलईडी स्मार्ट टीव्ही, तृतीय क्रमांकाला इलेक्ट्रिक शेगडी, तर चौथ्या क्रमांकाला मिक्सर देण्यात येणार आहे. याशिवाय, दांडिया महोत्सवातही दररोज आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे.दांडिया महोत्सवाच्या निमित्ताने रिल्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ७ हजार ७७७ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये अशी रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
नाथ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सौरभ उंडे यांनी राहुरीतील महिलांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे. महिलांसाठी मनोरंजनाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.