भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे

जनहिताच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने स्वतंत्र सामाजिक व राजकीय वाटचाल सुरू ठेवण्याचा निर्णय

फलटण जि.सातारा,  दिनांक १२ ऑक्टोबर २६: भारतीय जनता पक्षाला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला राजकीय पाठिंबा मागे घेत असल्याची जाहीर घोषणा ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे. यापुढे भाजपशी कोणताही राजकीय संबंध राहणार नसल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले. जनहिताच्या अपेक्षांची पूर्तता होत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
ॲड. खरात यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, भाजपला पाठिंबा देण्यामागे सत्तेचे समर्थन करणे हा उद्देश नव्हता. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा, विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, महिलांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी आणि युवकांच्या भविष्याला योग्य दिशा मिळावी, या अपेक्षेतून त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, या प्रश्नांवर अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने पाठिंबा कायम ठेवणे योग्य वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपण भाजपच्या अधिकृत सभासद नसून पक्षात अधिकृत प्रवेशही केलेला नव्हता, असेही ॲड. खरात यांनी स्पष्ट केले. आपले सामाजिक व राजकीय कार्य कोणत्याही पक्षाच्या किंवा सत्तेच्या चौकटीपुरते मर्यादित नसून, सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि लोककल्याणासाठी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यापुढे स्वतंत्र व अपक्ष पद्धतीने सामाजिक आणि राजकीय कार्य सुरू ठेवणार असल्याचे सांगताना, महिला, विद्यार्थी, युवक आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविण्याची भूमिका त्यांनी मांडली. आपल्या निर्णयाकडे राजकीय आकसातून घेतलेली भूमिका म्हणून न पाहता, सामाजिक बांधिलकीतून घेतलेला निर्णय म्हणून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवाहन
सध्या सुरू असलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसह आगामी निवडणुकांमध्ये भाजपला आपला कोणताही पाठिंबा राहणार नसल्याचे ॲड. खरात यांनी स्पष्ट केले. मतदार, पदवीधर मतदार, समर्थक आणि हितचिंतकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. उमेदवाराची कार्यक्षमता, प्रामाणिकपणा, जनतेप्रती बांधिलकी आणि लोकहिताची भूमिका विचारात घेऊन विवेकाने मतदान करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
‘जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद असून, जनसेवा हेच माझे अंतिम ध्येय आहे,’ अशी भूमिका ॲड. कांचन खरात यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *