राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर राहुरी तालुक्यात मिशन वात्सल्य समितीची बैठक मंगळवारी तहसीलदार डॉ. अमित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सलग तीन महिने बैठक न झाल्याच्या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतल्यानंतर ही बैठक घेण्यात आली. यावेळी एकल महिला व एकल बालकांच्या प्रश्नांवर सात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता झालेल्या बैठकीस बालविकास प्रकल्प अधिकारी जी. बी. शिंदे, गट शिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, सहायक निबंधक बाळासाहेब रायकर, संजय गांधी निराधार योजनेचे संजय वाघ, महिला व बाल विकास विभागाचे एच. बी. गिरवले तसेच साऊ एकल महिला समितीचे अशासकीय सदस्य व आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब भिमराज ढूस उपस्थित होते.
शासन निर्णयानुसार मिशन वात्सल्य समितीची बैठक दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी घेणे बंधनकारक आहे. मात्र राहुरी तालुक्यात सलग तीन महिने बैठक झाली नव्हती. याबाबत अशासकीय सदस्य आप्पासाहेब ढूस यांनी संबंधित विभागाकडे विचारणा केली असता समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे ई-मेलद्वारे तक्रार केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने दखल घेत राज्यातील तहसीलदारांना नियमित बैठका घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राहुरीतील बैठक पार पडली.
बैठकीत तालुक्यातील सर्व एकल महिलांची गावनिहाय गणना करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच एकल बालकांची माहिती संकलित करून बालसंगोपन योजनेपासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
याशिवाय एकल महिलांच्या विविध प्रश्नांना सर्व शासकीय विभागांमध्ये प्राधान्य देणे, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविणे, वैद्यकीय बिलात सवलत मिळण्यासाठी तालुक्यातील रुग्णालयांना विनंती करणे, मोफत उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा समितीमार्फत सन्मान करणे तसेच वारसा हक्काच्या मालमत्तेसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचेही ठरविण्यात आले.
बैठकीच्या शेवटी अशासकीय सदस्य आप्पासाहेब भिमराज ढूस यांनी तहसीलदार डॉ. अमित पवार यांनी तातडीने बैठक आयोजित करून महत्त्वाचे निर्णय घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले. मिशन वात्सल्य अंतर्गत एकल महिला व एकल बालकांना न्याय आणि सन्मान मिळवून देण्यासाठी हे निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.