राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी, कोंढवड, शिलेगाव, केंदळ आणि आरडगाव परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची एसटी बससेवेची मागणी आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. विधान परिषद सदस्य प्राजक्त तनपुरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मंगळवारी या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर बसची चाचणी घेतली.
राहुरी रेल्वे स्टेशन–तांदुळवाडी–कोंढवड–शिलेगाव–केंदळ–आरडगाव या मार्गावर बससेवा सुरू करण्यासाठी आ. प्राजक्त तनपुरे यांनी विभाग नियंत्रक तसेच श्रीरामपूर आगार व्यवस्थापक यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. या मार्गावर मोठ्या संख्येने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच ग्रामस्थांची दररोज ये-जा होत असल्याने बससेवेची गरज अधोरेखित करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने संबंधित मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून बसची प्रायोगिक चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. चाचणी समाधानकारक झाल्यानंतर या मार्गावर नियमित एसटी बससेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
ही बससेवा सुरू झाल्यानंतर तांदुळवाडी, कोंढवड, शिलेगाव, केंदळ आणि आरडगाव परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, महिला व सर्वसामान्य प्रवाशांना सुरक्षित, स्वस्त आणि नियमित सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामस्थांनी आ. प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे.