राहुरी वेब प्रतिनिधी,शरद पाचारणे : महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी विधानपरिषदेचे सदस्य तथा माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त प्रसादराव तनपुरे यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे राज्यभरातील क्रीडा क्षेत्रातून स्वागत होत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
निवडीनंतर आ. तनपुरे यांनी असोसिएशनमधील सर्व पदाधिकारी, जिल्हा संघटना आणि संपूर्ण व्हॉलीबॉल परिवाराचे आभार मानले. अध्यक्षपदाची निवड ही आनंदाची बाब असली, तरी त्यासोबत मोठी जबाबदारीही असल्याची जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी चंद्रपूरचे श्री. जीवतोडे यांची असोसिएशनच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच मावळते अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी असोसिएशनचे सक्षम नेतृत्व करत संघटनेच्या प्रगतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.
राज्यातील व्हॉलीबॉल खेळाला नवी ऊर्जा, नवी दिशा आणि नवी उंची मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आ. तनपुरे यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील खेळाडूंपासून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंपर्यंत सर्वांना अधिक संधी, दर्जेदार सुविधा आणि सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील व्हॉलीबॉल अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि यशस्वी करण्यासाठी असोसिएशनमधील सर्व पदाधिकारी, जिल्हा संघटना आणि खेळाडूंनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही आ. तनपुरे यांनी केले.