राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : प्रस्तावित राहुरी–शनिशिंगणापूर रेल्वेमार्गामुळे राहुरी तालुक्यातील बागायती व सुपीक शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याने हा रेल्वेमार्ग तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी राहुरीचे आमदार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. यासंदर्भातील सविस्तर निवेदनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले.
राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आमदार कर्डिले यांनी प्रस्तावित रेल्वेमार्गाला राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे राहुरी तालुक्यातील सुपीक, बागायती व ऊसपट्ट्यातील मोठ्या क्षेत्रावर परिणाम होणार असून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे विभाजन होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतीची उत्पादकता व शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे कर्डिले यांनी सांगितले. यापूर्वी विविध विकास प्रकल्पांसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या असून, पुन्हा एकदा जमीन संपादनामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
विकासाला विरोध नसून तो शेतकऱ्यांच्या हिताला बाधा न आणता व्हावा, अशी भूमिका मांडत प्रस्तावित राहुरी–शनिशिंगणापूर रेल्वेमार्ग रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.
याचबरोबर शनिशिंगणापूर येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी राहुरी रेल्वे स्थानकावर सर्व एक्सप्रेस व पॅसेंजर रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा, तसेच राहुरी रेल्वे स्थानक ते शनिशिंगणापूर दरम्यान नियमित, सुसज्ज व वारंवार बससेवा सुरू करावी, अशी पर्यायी मागणीही आमदार कर्डिले यांनी केली.
या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित विषयावर सकारात्मक भूमिका घेऊन योग्य तो मार्ग काढला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आमदार अक्षय कर्डिले यांनी दिली.