अहिल्यानगर दि.१ प्रतिनिधी –
स्व.बाळासाहेब विखे पा.यांनी पाहिलेले महाराष्ट्र दुष्काळमुक्तीचे स्वप्न त्यांचे सुपुत्र व राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांच्या कारकिर्दीत पुर्ण व्हावे,” अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण श्री.अण्णासाहेब हजारे यांनी व्यक्त केली.
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज राळेगणसिद्धी येथे जाऊन पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेत श्री. हजारे यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. ना. विखे पा. यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी ना . विखे यांच्यासमवेत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक श्री. विनायकराव देशमुख होते.
यावेळी मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सूरू असलेल्या कामाची तसेच राज्य दुष्काळ मुक्त करण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेल्या विविध योजनांची आणि उपक्रमांची माहिती श्री. हजारे यांना दिली.
प्राधान्याने शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून निर्णयांना प्राधान्य देण्यात येत असल्याने प्रामुख्याने कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या अखत्यारितील अनेक नवीन प्रकल्प सुरू करण्यात येत असून, धरणातील गाळ काढण्याचे धोरणही राज्य सरकारने घेतले आहे.यामध्ये अहील्यानगर जिल्ह्यातील मुळा धरणाचा समावेश केला असल्याचे ना. विखे यांनी सांगितले.
जलसंपदा विभागाने राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या कामांना विशेष प्राधान्य दिले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाच्या कार्यवाहीचे काम गतीने पुढे जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करून श्री.हजारे म्हणाले, ” स्व. खा.बाळासाहेब विखे पा. यांनी महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याची संकल्पना अनेक वर्षापूर्वी मांडली होती. या संदर्भात त्यांनी तज्ञांच्या मदतीने महत्त्वपूर्ण आराखडा देखील तयार केला होता. प्रामुख्याने कोकणातील पाणी घाटमाथ्यावर आणण्याच्या संदर्भात आणि नदीजोड प्रकल्पाबाबत त्यांच्या मनामध्ये नावीन्यपूर्ण कल्पना होत्या. या कल्पना प्रत्यक्षात आणून आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्व. विखे पा. यांचे स्वप्न साकार करावे,” अशी अपेक्षा श्री. हजारे यांनी व्यक्त केली.