‘लायन्स कन्सल्टंट’ व ‘भारत कन्स्ट्रक्शन’च्या संगनमतामुळेच निकृष्ट काम; कृती समितीचा आरोप

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : नगर-शिर्डी महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून राहुरीत सोमवारी वातावरण चांगलेच तापले. नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने आमदार प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन महामार्गाच्या दुरवस्थेबाबत निवेदन दिल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत राहुरी नगरपालिकेत तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), ‘भारत कन्स्ट्रक्शन’ कंपनी आणि कामावर देखरेख ठेवणाऱ्या ‘लायन्स कन्सल्टंट’ कंपनीच्या अधिकाऱ्यांना कृती समितीने धारेवर धरत गंभीर आरोप केले.

महामार्गाच्या कामाच्या दर्जाची तपासणी करण्याची जबाबदारी ‘लायन्स कन्सल्टंट’ कंपनीकडे होती. मात्र, या कंपनीची आणि ‘भारत कन्स्ट्रक्शन’ची मिलीभगत झाल्यामुळेच महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले, असा थेट आरोप कृती समितीच्या सदस्यांनी केला. ठेकेदाराच्या चुकीच्या कामाची वेळेत नोंद घेऊन एनएचएआयकडे अहवाल सादर करण्यात कन्सल्टंट कंपनीने हलगर्जीपणा केल्यानेच नव्याने तयार झालेला महामार्ग अल्पावधीत उखडल्याचा दावा समितीने बैठकीत केला.

कामाच्या गुणवत्तेबाबत योग्य वेळी अहवाल दिला असता, तर कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला महामार्ग इतक्या मोठ्या प्रमाणावर खराब झाला नसता, असे समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांसमोर ठामपणे मांडले. संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने बैठकीत काही काळ खडाजंगी झाली.

महामार्गाची झालेली दुरवस्था आणि नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित कंपन्या व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तातडीने सर्व त्रुटी दूर करून दर्जेदार पद्धतीने रस्ता दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. तसेच कामातील दोषींवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी पुढे आली.

बैठकीस रस्ता दुरुस्ती कृती समितीचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *