राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे – शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा स्तुत्य उपक्रम श्री तुळजाभवानी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या जयंतीनिमित्त तांदुळवाडी येथे आयोजित करण्यात आला.
ग्रामपंचायत सदस्या सौ. स्वाती विनीत धसाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सन्मानपत्र प्रदान करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पेरणे होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा केवळ त्यांच्या यशाचा गौरव नसून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, आत्मविश्वास आणि शैक्षणिक प्रगतीची जिद्द निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुरी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक सर्जेराव पेरणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही. सातत्यपूर्ण परिश्रम, चिकाटी, वेळेचे योग्य नियोजन आणि अभ्यासातील एकाग्रता यांच्या बळावर विद्यार्थी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. श्री तुळजाभवानी सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सौ. स्वाती धसाळ यांनी राबविलेला विद्यार्थी गौरव उपक्रम समाजासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार विनीत धसाळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी समाजहिताची जपलेली परंपरा आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठीचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जात आहे. शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि युवा पिढीला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या प्रसंगी ज्येष्ठ भास्कर काशिनाथ पेरणे, सेवा संस्थेचे माजी चेअरमन बाळासाहेब चिमाजी धसाळ, हभप भगवान महाराज मोरे, हभप महेश महाराज खाटेकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खडके, ज्येष्ठ तुकाराम हंडाळ, विकास कुलकर्णी, माजी सैनिक भैय्यासाहेब आढाव, संतोष पवार, किरण गायकवाड, सेवा संस्थेचे सदस्य अविनाश पेरणे, योगेश पेरणे, प्रमोद खडके, लालखान शेख, रेवन्नाथ धसाळ, भाऊसाहेब गंगाधर पेरणे, कासिम शेख, नितीन मकासरे, रावसाहेब खडके, दिलीप पेरणे, संतोष धसाळ, बबन डुक्रे, मच्छिंद्र लोखंडे, भाऊसाहेब धागुडे, मुर्तुजा शेख, भगवान पेरणे, रमेश वराळे, संजय बर्डे यांच्यासह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री तुळजाभवानी सामाजिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा ग्रामपंचायत सदस्या सौ. स्वाती विनीत धसाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.