राहुरी, वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन फिरत असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत नागरिकांनी पोलीस व महसूल प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. तसेच स्थानिक पत्रकारांनीही हा विषय सातत्याने लावून धरत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिसांनी ड्रोनच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तालुक्यात संशयित ड्रोन शोधून निष्प्रभकरण्यासाठी अँटी-ड्रोन यंत्रणा मागविण्यात आली आहे.
आज राहुरी फॅक्टरी परिसरात या अँटी-ड्रोन मशीनचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी पोलिसांचे पथक आवश्यक उपकरणांसह परिसरात तैनात करण्यात आले असून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी ड्रोनबाबत कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.
राहुरी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी घेतलेल्या या उपाययोजनांचे स्वागत होत असून ड्रोनविषयी पसरलेल्या अफवांना आळा बसण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.