पुढची आवर्तने फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच; पाण्यासह खर्चाचीही बचत करा : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

​राहाता, दि. २३ (प्रतिनिधी) :

‘‘धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून सध्या आवर्तनाचा लाभ देण्याचा प्रयत्न झाला असला, तरी उद्याचा काळ अधिक आव्हानात्मक असणार आहे. पुढची आवर्तने झालीच, तर ती केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच असतील. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाण्यासह अनावश्यक खर्चाचीही बचत करावी,’’ असे स्पष्ट निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

​राहाता तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. मागील महिन्यात झालेल्या बैठकीतील सूचनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी तुकाराम हुलहुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, ज्ञानेश्वर गोंदकर, नगराध्यक्षा जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

​पाणीपुरवठा योजनांच्या संथ कामावर नाराजी

गोदावरी व निळवंडे धरणातून सोडलेल्या आवर्तनामुळे मोठा दिलासा मिळाल्याबद्दल बैठकीत मंत्री विखे पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले. मात्र, पाणीपुरवठा योजनांच्या प्रलंबित समस्यांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. साकुरी गावच्या पाणीपुरवठा योजनेचे ८० टक्के काम पूर्ण होऊनही उर्वरित काम रखडल्याने पाणी मिळत नसल्याचे निदर्शनास येताच त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच मुळा आणि कुकडीचे आवर्तन सुरू असताना कोठेही अनधिकृत पाणी उपसा होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. यावेळी वाकडी, चितळी, आडगाव येथील ग्रामस्थांनी विविध सूचना मांडल्या.

​चारा उत्पादनासाठी संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश

‘‘दुष्काळी परिस्थितीत पशुधन हाच ग्रामीण भागाचा एकमेव आधार आहे. मात्र, गावपातळीवर पशुपालक आणि चारा उत्पादनासाठी इच्छुक शेतकऱ्यांची माहिती अद्याप संकलित न होणे ही गंभीर बाब आहे,’’ असे म्हणत त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. प्रत्येक गावात कृषी सहायक आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने संयुक्त सर्वेक्षण करून चारा उत्पादनाचे नियोजन करावे व सध्याच्या आवर्तनाचा लाभ चारा पिकांच्या वाढीसाठी करून घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

​कर्जमाफी व वीज प्रश्नावर बुधवारी विशेष बैठक

पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त झाल्या असल्या, तरी बँकांकडून अधिकचे व्याज आकारले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. यावर गटविकास अधिकाऱ्यांनी बुधवारी विशेष बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करावे, तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात थांबून गावनिहाय वीज प्रश्न मार्गी लावावेत, असे आदेश मंत्र्यांनी दिले. भविष्यात लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्व बैठका विभागनिहाय घेतल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

​विवाह सोहळे ५० लोकांत आटोपून आदर्श निर्माण करा

पाण्याबरोबरच खर्चावर नियंत्रण आणण्याचे आवाहन करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, ‘‘विवाह सोहळ्यांवरील अनावश्यक खर्च कमी करून केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत समारंभ करावेत. राहाता तालुक्याने याची सुरुवात करून संपूर्ण राज्यासमोर एक नवा आदर्श निर्माण करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने इतर सर्व खर्चांना फाटा देऊन दुष्काळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *