मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात गणेगाव प्रथम

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे –  महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या राहुरी तालुकास्तरीय तपासणीत आदर्श गाव गणेगाव ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला आहे. गावातील सर्वांगीण विकास, स्वच्छता, मूलभूत सुविधा, ग्रामस्थांचा सहभाग, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि पारदर्शक प्रशासन या विविध निकषांवर गणेगावने ८६ गुण मिळवत तालुक्यात अव्वल स्थान पटकावले.

या स्पर्धेमध्ये ब्राह्मणी ग्रामपंचायतीने ६१ गुणांसह द्वितीय क्रमांक, तर सडे ग्रामपंचायतीने ५७ गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. गणेगावच्या या यशामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे सखोल परीक्षण करण्यात आले. यात स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी, पाणीपुरवठा व्यवस्था, कर वसुली, डिजिटल सेवा, महिला व बालकल्याण उपक्रम, पर्यावरण संवर्धन, ग्रामसभांचे आयोजन, सार्वजनिक सुविधा आणि विकासकामांची गुणवत्ता या बाबींना विशेष महत्त्व देण्यात आले.

तालुकास्तरीय तपासणीतील गुणांकन पुढीलप्रमाणे :

गणेगाव – ८६

ब्राह्मणी – ६१

सडे – ५७

दवणगाव – ५७

केंदळ बु. – ५७

कणगर – ५६

वांजुळपोई – ५४

उंबरे – ५३

टाकळीमिया – ५२

खडांबे खुर्द – ५२

मांजरी – ५०

गणेगाव ग्रामपंचायतीने गावाच्या विकासासाठी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची या अभियानातून दखल घेण्यात आली. ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, गणेगावच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत असून आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतही गाव उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *