ड्रोन अफवांवर नियंत्रणासाठी फोटोग्राफर संस्थेचा पुढाकार

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : तालुक्यात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोनबाबत विविध अफवा पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी राहुरी तालुका फोटोग्राफर सामाजिक संस्था आणि राहुरी पोलिस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

ड्रोनबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी तसेच पोलिसांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर पोलिस मित्र म्हणून काम करणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यासंदर्भात राहुरी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

बैठकीत राहुरी फोटोग्राफर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कुलदीप नवले, सचिव गणेश नेहे, उपाध्यक्ष बाबा जाधव यांच्यासह महेश शिंदे, किरण शिंदे, गंगाधर गीते, संजय गायकवाड, सचिन गाडे, दीपक गुलदगड, संकेत येवले, मंगेश गाडेकर, संदीप वाणी, प्रकाश बोबडे, शुभम भोसले, शिवाजी लांडगे, देवराज मंतोडे, संदीप भांड, सचिन वराळे, अभी आगाव, रज्जाक पठाण, ऋषिकेश देशमुख, श्री केदार, आशिष बडदे, बाळासाहेब सावंत आदी उपस्थित होते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून फोटोग्राफरांना पोलिस मित्र म्हणून कार्य करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे ठेंगे यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील विविध मंगल कार्यालयांमध्ये रात्री उशिरापर्यंत होणारे हळदी व डीजे कार्यक्रम रात्री १० नंतर होऊ नयेत, यासाठी संबंधितांना नोटिसाही देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ड्रोन आणि चोरीच्या घटनांचा कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. ड्रोन संदर्भात कोणतीही माहिती अथवा शंका असल्यास आपल्या गावातील पोलिस मित्र म्हणून कार्यरत फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले.

मदतीसाठी नागरिकांनी डायल ११२ किंवा राहुरी पोलिस ठाण्याचा ०२४२६-२३२४३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *