राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत दैनिक पुण्यनगरीच्या वतीने दिला जाणारा ‘द हिरोज ऑफ अहिल्यानगर 2026’ हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. शिर्डी येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश तसेच बीजमाता पद्मश्री राहिबाई पेरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.ऑपरेशन मुस्कान अभियानांतर्गत राहुरी पोलिसांनी तब्बल १०९ मुलींचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात दिले होते. या संवेदनशील आणि प्रभावी कार्याची दखल घेत पुण्यनगरी वृत्तसमूहाने ठेंगे यांची पुरस्कारासाठी निवड केली.पुरस्कार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी हा सन्मान वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, राहुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांच्या टीमवर्कला समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. तसेच राहुरी तालुका कलाकार मंच, स्नेहालय संस्था अहिल्यानगर, केअर संस्था पुणे यांनी जनजागृतीसाठी घेतलेला पुढाकार, राहुरी तालुक्यातील शालेय शिक्षक, शिक्षण विभाग आणि पोलीस पाटील यांच्या सहकार्याचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.या कार्यासाठी राकेश ओला, सोमनाथ घार्गे, मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, सोमनाथ वाघचौरे, डॉ. बसवराज शिवपुजे आणि जयदत्त भवर यांचे मार्गदर्शन लाभल्याचेही त्यांनी सांगितले.