महात्मा फुले कृषि विद्यापीठाने तयार केलेल्या कृषि यंत्रास मिळाले पेटंट

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे –

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पामध्ये संशोधित केलेल्या ट्रॅक्टरचलीत स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित या यंत्रास भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने पेटंट प्रदान केले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली या यंत्राच्या संशोधनात महत्वाचे योगदान देणारे अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुलसीदास बास्टेवाड तसेच त्यांचे सहकारी डॉ. संजय भांगरे, डॉ. रवीकिरण राठोड, इंजि. रोहित गेठे यांचा यामध्ये सहभाग आहे.सदर यंत्र 55 अश्वशक्ति आणि त्यापेक्षा जास्त ट्रॅक्टरने सहज चालते, स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित एकत्रित मशागतीने पेरणी योग्य जमीन तयार करण्यासाठी उपयुक्त आहे. या यंत्राच्या वापरामुळे मशागतीसाठी लागणार्या खर्चात आणि वेळेत बचत होते. एका तासांमध्ये 0.33 हेक्टर क्षेत्रावर मशागत करता येते. या यंत्राच्या वापरामुळे पारंपारिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये 44% पर्यंत बचत होते. एकत्रित मशागत करण्यासाठी विकसीत करण्यात आलेल्या या ट्रॅक्टरचलीत फुले स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित या यंत्रास राज्यस्तरीय संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती बैठक-2025 मध्ये प्रसारीत करुन शिफारशीत करण्यात आलेले आहे. कुलगुरु डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (कृषि अभियात्रिकी) डॉ. एस.एन. झा, सहाय्यक महासंचालक डॉ. के.पी. सिंग, भोपाळ येथील केंद्रिय कृषि अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ. सी.आर. मेहता, अखिल भारतीय समन्वीत कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प संचालक डॉ. पी.एन. अग्रवाल व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांनी या पेटंटमध्ये सहभागी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. कृषि विद्यापीठाच्या सर्व स्तरातुन संबंधीत शास्त्रज्ञांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *