कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे –

शेती शाश्वत करण्यासाठी विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रभावी ठरणार असून यामध्ये कृषि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे. विद्यार्थ्यांमध्ये खुप मोठी क्षमता आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. यासाठी विद्यापीठामध्ये स्पर्धात्मक परिक्षा, कृषि उद्योजकता व शेतीमधील उच्च तंत्रज्ञान या तीन फोरमची स्थापना करण्यात आली असून हे फोरम विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी उपयुक्त ठरतील असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले.महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सन 2025-26 या वर्षाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. विलास खर्चे बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन पुणे येथील बोल्डनेट इंडिया करिअर सर्व्हीसेस या संस्थेचे संचालक इंजि. अविनाश देशमुख उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, काष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज संकुलाचे प्रमुख डॉ. महानंद माने व विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. कैलास कांबळे उपस्थित होते.कुलगुरु डॉ. विलास खर्चे आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. हा त्यांच्या आयुष्यामधील अभिमानाचा क्षण म्हणावा लागेल. विद्यापीठाने शेती संशोधनामध्ये फार मोठे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. शेतकरी हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतात वापरत आहेत. या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे कारण दुसरी हरितक्रांती ही कृषि अभियांत्रिकीचे विद्यार्थीच करतील असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. यावळी इंजि. अविनाश देशमुख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की फक्त स्पर्धा परिक्षांवर अवलंबून न राहता आपली क्षमता ओळखुन काम करा. कृषि क्षेत्रातील शिक्षण न घेतलेले कृषि उद्योजक होत आहेत. तुम्ही तर या शेती क्षेत्रात शिक्षण घेत आहात. तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला शोधा. तुमच्यातील कोणत्याही एका क्षमतेला विकसीत करण्यासाठी पाच वर्षांचा वेळ द्या. हे जग म्हणजे मोठे मार्केट असून यामध्ये खुप सार्या संधी आहेत. फक्त स्वतःला ओळखुन स्वतःकरीता योग्य क्षेत्र निवडण्याची गरज असल्याचे यावेळी ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन नलावडे यांनी केले. डॉ. अवधुत वाळुंज यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करुन दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार डॉ. कैलास कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य उगले, संस्कृती सरोदे, साई मंडलीक व मधुरा लांडगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *