राहाता : राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात कॅनॉललगतच्या खोलीत सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून आणखी एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत १६ आरोपींना अटक करण्यात आली असून अनेक डॉक्टर व एजंट पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान पुण्यातून अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींकडे बारकाईने चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी मारुती विश्वनाथ ढोरे (वय ४८, रा. केशवनगर, वडगाव मावळ) याला देखील गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे मशीन विकल्याची कबुली दिली होती.
त्या माहितीच्या आधारे लोणी पोलिस व अपर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने संबंधित आरोपीचा शोध घेतला. दिवसभर शोधमोहीम राबविल्यानंतर आरोपी पोलिसांच्या हाती लागला. चौकशीदरम्यान त्याच्याकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले. याच मशीनच्या सहाय्याने तो गर्भलिंग निदान चाचण्या करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे संबंधित आरोपी डॉक्टर नसतानाही तो अशा प्रकारच्या चाचण्या करत होता.
दरम्यान, आरोपीची शारीरिक स्थिती अटक करण्यास योग्य नसल्याचे निदर्शनास आल्याने त्याला तपासासाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या प्रकरणातील पुणे येथील आरोपींनी आणखी काही डॉक्टरांना अशी मशीन विकल्याची कबुली दिल्याने तपासाचा विस्तार करण्यात आला आहे. अनेक डॉक्टर, एजंट व संशयित व्यक्तींची माहिती पोलिसांना मिळाल्याचे सांगण्यात येत असून त्या अनुषंगाने विविध ठिकाणी तपास सुरू आहे.
या कारवाईत केवळ कायदेशीर बाजूच नव्हे, तर सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून पोलिस प्रशासन काम करत असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.