अहिल्यानगर : स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी चांगल्या भौतिक सुविधा किंवा मजबूत आर्थिक परिस्थितीची आवश्यकता नसून, जिद्द, चिकाटी आणि मेहनत हीच यशाची खरी त्रिसूत्री असल्याचे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय पोलिस दलात थेट असिस्टंट कमांडंट पदावर निवड झालेले महेश जंजिरे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या रेसिडेन्शिअल हायस्कूलचे माजी विद्यार्थी महेश ईश्वर जंजिरे यांची केंद्रीय पोलिस दलात असिस्टंट कमांडंट पदावर थेट निवड झाली आहे. खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ते आता देशसेवेत रुजू होत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे व सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, सहसचिव मुकेश मुळे, कार्यकारिणी सदस्या अरुणा काळे, महेश जंजिरे यांचे वडील ईश्वर जंजिरे, आई सुनीता जंजिरे, पत्नी काजल जंजिरे, प्राचार्य धनंजय म्हस्के, उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर, प्रा. रवींद्र देवढे, प्रा. डॉ. सुधाकर सुंबे यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रामचंद्र दरे व विश्वासराव आठरे पाटील यांनी महेश जंजिरे यांच्या ‘युपीएससी’मधील यशाचे कौतुक करताना, ग्रामीण भागातील व प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची यशोगाथा प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महेश जंजिरे म्हणाले, “राज्य व देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी विद्यार्थ्यांचे प्रमाण पूर्वी कमी होते. आता ते वाढत असले तरी अपेक्षेइतके नाही. अनेक विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक परिस्थिती मजबूत नसल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकत नाही, असा न्यूनगंड असतो. मात्र जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर कोणालाही यश मिळवता येते.”
प्राचार्य धनंजय म्हस्के यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू विशद केला. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर, प्रा. रवींद्र देवढे व प्रा. डॉ. सुधाकर सुंबे यांनी विशेष परिश्रम घेतले.
महेश जंजिरे यांना विद्यार्थ्यांचा गराडा; प्रश्नांची सरबत्ती
कार्यक्रमानंतर खाकी वर्दीतील रुबाबदार व्यक्तिमत्त्वामुळे महेश जंजिरे यांच्याभोवती विद्यार्थी व पालकांनी अक्षरशः गराडा घातला. अनेकांनी त्यांच्या सह्या घेत हस्तांदोलन केले, तर काहींनी त्यांच्या वर्दीकडे कुतूहलाने पाहत संवाद साधला.
काही विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकांनी राज्य व केंद्रीय स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम, अभ्यासाची पद्धत, वाचनाची सवय, सामान्य ज्ञान, विषयांची निवड आदींबाबत विविध प्रश्न विचारले. महेश जंजिरे यांनीही अत्यंत सोप्या आणि ओघवत्या भाषेत सर्वांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यातही सर्वतोपरी मदत व मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.