राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : राहुरी तालुक्यातील गणेगाव येथे “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत पंचायत समिती परळी (जि. बीड) यांच्या समितीने पाहणी करून ग्रामविकासाच्या विविध कामांची माहिती घेतली. शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार गावाने विविध क्षेत्रांत केलेल्या कामाचे समितीने कौतुक केले.राज्य शासनातर्फे १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानामध्ये सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध व स्वच्छ गाव, मनरेगा योजनांचे अभिसरण, संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग व नाविन्यपूर्ण उपक्रम अशा आठ घटकांचा समावेश आहे.गणेगावात लोकसहभागातून शिक्षण, अंगणवाडी विकास, सिंचन व्यवस्था, वृक्षलागवड, स्वच्छता आणि विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले आहेत. ग्रामस्थांच्या सहभागामुळे विकासकामांना गती मिळाल्याचे समितीने नमूद केले.पाहणी दौऱ्यात पंचायत समिती परळीचे गटविकास अधिकारी राजवर्धन भोसले, विस्तार अधिकारी रणजीत शेंडगे, तमनर, अंभोरे तसेच कराड यांनी विविध विकासकामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.यावेळी सरपंच सौ. शोभाताई अमोल भनगडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचे विशेष कौतुक करण्यात आले.ग्रामविकासासाठी योगदान देणाऱ्या ग्रामस्थांचाही समितीने गौरव केला.ग्रामपंचायत अधिकारी अर्चना हारदे, केंद्र चालक मंजुषा सोनवणे, शिक्षक सुनील गुंजाळ, ईश्वर मोरे, अंगणवाडी सेविका प्रणाली भवर, सुनिता कोबरणे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि विकासकामांच्या माध्यमातून गणेगावाने आदर्श ग्रामविकासाचा उत्कृष्ट नमुना उभा केला असून हे गाव राज्यासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना समिती सदस्यांनी व्यक्त केली.