अमली पदार्थ मुद्देमाल अपहारप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडीवर कारवाईची मागणी

राहुरी : अहिल्यानगर येथील जप्त अमली पदार्थांच्या मुद्देमालातील कोट्यवधी रुपयांचा माल सरकारी गोदामातून चोरी करून विक्री केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्यावर नव्याने चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी राहुरी तालुक्यातील वळण येथील विजय अण्णासाहेब मकासरे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मकासरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणात पोलिस हवालदार शामसुंदर गुजर याच्यावर कारवाई करण्यात आली असली तरी मुद्देमाल  सुरक्षेची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. जप्त अमली पदार्थ सरकारी गोदामातून चोरी होऊन त्याची विक्री झाल्याचा गंभीर प्रकार घडला असताना संबंधित अधिकाऱ्यांना अभय दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मुद्देमाल सुरक्षित ठेवण्याबाबत केंद्र सरकारच्या एनडीपीएस नियमावलीतील तरतुदींचे पालन करण्यात आले नाही. मुद्देमाल कक्षाची नियमित तपासणी, वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती, नोंदवही तपासणी आदी नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी यापूर्वी चौकशीचे आदेश देण्यात आले होते, मात्र अद्याप संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात आमदार हेमंत ओगले यांनीही विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. तसेच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी चौकशीचे आश्वासन दिले होते. तरीही कारवाई लांबत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना तत्काळ निलंबित करून नव्याने निष्पक्ष चौकशी करावी, अन्यथा पोलिस महासंचालकांकडे दाद मागणार असल्याचा इशारा विजय मकासरे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *