राहुरी : नगर-मनमाड महामार्गावरील अवघ्या दोन महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निलेश दिनकर शिरसाठ यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. संबंधित कामाची चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात शिरसाठ यांनी म्हटले आहे की, नगर-मनमाड मार्गावरील पाण्याची टाकी ते राहुरी बसस्थानक, मार्केट यार्ड, धांडे पेट्रोल पंप, पी.डब्ल्यू.डी. कार्यालयासमोरील तसेच जुने बसस्थानक परिसरातील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालक, पादचारी, शालेय विद्यार्थी तसेच रुग्णवाहिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप करत त्याची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच संबंधित ठेकेदारावर ८ ते १० दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निलेश शिरसाठ यांनी प्रशासनाला दिला आहे. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी यश चितळकर, अमोल शिरसाट अक्षय शिरसाठ, प्रसाद गुंजाळ, अमित साळवे, यश शिरसाठ, अजय ढोकणे, सागर सत्रे उपस्थित होते.
दरम्यान, महामार्गावरील रस्त्याच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.