घरफोडीतील १.९० लाखांचा मुद्देमाल जप्त; विधीसंघर्षित बालकासह दोघे ताब्यात

अहिल्यानगर : शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत तोफखाना पोलिसांनी १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणात एका विधीसंघर्षित बालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरजेपूरा परिसरातील मिसाळ गल्ली येथे राहणाऱ्या एका महिलेच्या घरात ३ मे रोजी घरफोडी झाली होती. कुटुंबातील सदस्य वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त बाहेर गेल्याने घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा दरवाजा उघडा राहिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील कपाट व इतर साहित्याची उचकापाचक झाल्याचे निदर्शनास आले. तसेच सुमारे १३ ग्रॅम वजनाची सोन्याची दागिने चोरीस गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक बाळाजी वेद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश चौरे यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

या गुन्ह्यात त्याच्या दोन साथीदारांचा सहभाग निष्पन्न झाला. त्यानुसार दुर्गेश चंद्रकांत चिंतामणी (रा. टाळमंडई परिसर) व प्रकाश रामसाहेब उपासे (रा. बालिकाश्रम रोड, सिद्धीविनायकनगर) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीस गेलेली १ लाख ९० हजार रुपये किमतीची १३ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त करण्यात आली.

या कारवाईस पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने विशेष प्रयत्न केले. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश साठे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *